कोरीगड किंवा कोराईगड हा मावळ भागातील एक प्रमुख किल्ला आहे. मावळ प्रांत हा विस्तीर्ण असल्यामुळे तो बारा भागात विभागण्यात आला होता. त्यापैकी मुळशी नदीच्या खोऱ्याजवळ असलेल्या कोरबारसे मावळ या भागात हा किल्ला आहे.कोरीगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ९३० मी आहे.
कसे जावे ?
कोरीगड किल्ला हा लोणावळ्यापासून अदमासे २५ कि मी वर असलेल्या पेठ शहापूर या गावाजवळील वाटेने १ ते १.३० तासात चढता येतो.या गावात येण्यासाठी प्रथम रेल्वे अथवा रस्त्याच्या मार्गाने लोणावळ्याला यावे लागते. लोणावळ्यातून ॲम्बी व्हॅलीकडे जाणाऱ्या रस्त्याने गाव गाठता येते.लोणावळ्याच्या एस.टी स्थानकातून ॲम्बी व्हॅलीकडे जाणारी एस.टी आपल्याला पेठ शहापूर गावात आणते.
कोरीगड किल्ला उत्तर- दक्षिण पसरलेला आहे.किल्ल्यावर येण्यासाठी उत्तरेकडील पेठ शहापूर गावातून मळलेली वाट आहे.पेठ शहापूर गाव डावीकडे ठेवत एक पायवाट आपल्याला साधारण अर्ध्या तासात किल्ल्याच्या पायर्यांजवळ आणून सोडते. या पायवाटेने आपण किल्ल्याच्या उत्तरेकडून किल्ल्याच्या पुर्वेकडील भागात येतो. ज्या ठिकाणी पायर्या सुरू होतात तो किल्ल्याचा पायथा आहे.किल्ल्यावर येण्यासाठी २८० पायर्या आहेत.
साधारण १०० पायर्या चढल्यावर उजवीकडे एक मोठी गुहा दिसते.त्या गुहेच्या बाजूला एक छोटे गणेश मंदिर आहे. गुहा बर्यापैकी प्रशस्त आहे.पावसाळा वगळता या गुहेत ८-१० लोक वास्तव्य करू शकतात.
साधारण १४० पायर्या चढल्यावर उजवीकडे एका छोट्या गुहेत एक पाण्याचे टाके दिसते.यातील पाणी पिण्ययोग्य नाही.एक किंवा दोन माणसे बसू शकतील इतकीच जागा या गुहेत आहे.
साधारण १८० पायर्या चढल्यावर समोर एक अजून छोटी गुहा आहे. या गुहेच्या डाव्या बाजूला थकलेल्यांना बसण्यासाठी काही बाके आहेत.या ठिकाणाहून किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ आल्याची जाणीव होते.
या वाटेने उरलेल्या पायर्या चढून आपण गणेश दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करतो.गणेश दरवाजाच्या वरच्या बाजूला दोन्ही बाजूस कमलपुष्पे कोरलेली आहेत.आता एक लाकडी दरवाजा बसवला आहे.
काय पहावे ?
कोरीगड किल्ल्याची वैशिष्ट्ये म्हणजे त्याचा विस्तार आणि इतका विस्तीर्ण असून आजही बर्यापैकी मजबूत अवस्थेत असलेली किल्ल्याची तटबंदी. कोरीगड किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्ल्याची टेहळणी करता येते. तटबंदीवरून चालणे हा एक वेगळा अनुभव असतो. तटबंदीवर जागोजागी तोफा डागण्यासाठी असलेल्या जंग्या आहेत तसेच काही लहान मोठ्या तोफा किल्ल्यावर पहायला मिळतात.
कोराईमाता मंदिर –
किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूला कोराईमातेचे मंदिर आहे.हे मंदिर एका पक्क्या घराप्रमाणे बांधलेले आहे. मंदिराला पत्र्याचे छप्पर आहे.मंदिरात कोराईमातेची मूर्ती आहे.मंदिराच्या प्रवेशद्वारावर हत्ती कोरलेले आहेत. मंदिरासमोर एका चौथर्यावर दीपमाळ आहे.मंदिरासमोर बसायला काही बाके आहेत.कोराईमातेच्या मंदिरावरून या किल्ल्याला कोराईगड असे म्हणतात.
चोर दरवाजा –
कोरईमातेच्या मंदिरावरून पुढे उतरल्यास एक दरवाजा दिसतो.कोरीगडावरून एक वाट किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूला आंबवणे गावात उतरते.या मार्गाची बर्याच प्रमाणात पडझड झालेली असल्याने या वाटेने किल्ल्यावर फारसे कोणी येत नाही.या चोर दरवाजाचा उपयोग संकटकाळात किल्ल्यावरून निसटण्यासाठी केला जात असे.
दक्षिणेकडील बुरूज –
चोर दरवाजाच्या बाजूने किल्ल्याच्या दक्षिणेकडे गेल्यास आपल्याला एक बुरुज पहावयास मिळतो.हा बुरुज किल्ल्याचा दक्षिणेकडील शेवटचा भाग आहे. या बुरुजाखाली एक दुसरा बुरुज पहिल्या बुरुजाच्या बाहेरच्या बाजूला आहे.या बुरुजावरून मुळशी नदी, मुळशी तलावाचा भाग आणि ॲम्बी व्हॅली (छोटी घरे, विमानतळ आणि इतर इमारती) पहावयास मिळतात.
शिवमंदिर –
महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक किल्ल्यावर एक शिवमंदिर असतेच, त्याप्रमाणे कोरीगडावरसुद्धा एक शिवमंदिर आहे.हे शिवमंदिर गणेश दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे आहे.शिवमंदिराच्या समोर दगडात कोरलेला नंदी आहे आणि बाजूला दोन मोठ्या तोफा पहावयास मिळतात.या शिवमंदिराच्या मागे अजून एक छोटे मंदिर आहे.
तलाव –
शिवमंदिराच्या मागे आणि एका बाजूला असे दोन मोठे तलाव किल्ल्यावर आहेत.एका काळात किल्ल्यावर खूप वस्ती असावी असा अंदाज या तलावांच्या आकारावरून बांधता येतो.तलावांमधील पाणी नितळ असले तरी पिण्ययोग्य नाही.
उत्तरेकडील बुरूज –
कोरीगडाची उत्तर बाजू निमुळती होत एका बुरूजावर संपलेली दिसते.या बुरूजावर एक निशाण आहे.पेठ शहापूर गावातून किल्ल्यावर येताना आपल्याला हा बुरूज दिसतो.या बुरुजावरून पेठ शहापूर गाव, आपण ज्या वाटेने किल्ल्यावर येतो ती वाट स्पष्ट दिसते.वातावरण स्वच्छ असेल तर या बुरुजावरून घनगड किल्ला, तेलबैला आणि सुधागड दिसू शकतो.
कधी जावे ?
कोरीगड किल्ला हा कोणत्याही ऋतूत पाहता येण्यासारखा किल्ला आहे.पावसाळ्यात दाट धुक्यामुळे किल्ला चढताना आणि फिरताना येणारा अनुभव अवर्णनीय असतो.पावसाळ्यात किल्ल्याच्या पायर्यांवरून चढताना खाली येणाऱ्या पाण्यातून चढण्याचा एक वेगळाच अनुभव मिळतो.
हिवाळ्यात स्वच्छ वातावरणामुळे किल्ल्यावरून आजूबाजूचा परिसर बघता येतो.हिवाळ्यात सकाळी किल्ल्यावरून मनसोक्त फोटोग्राफी करता येते.तसेच किल्ल्याच्या तटबंदीवरून चालणे हिवाळ्यात जास्त सुरक्षित आहे.
उन्हाळ्यात किल्ल्यावर असणाऱ्या पिण्ययोग्य पाण्याच्या अभावामुळे किल्ल्यावर येताना एक लीटर पाणी जास्त आणणे गरजेचे असते.उन्हाळ्यात सकाळी लवकर किल्ला बघून ऊन वाढण्याच्या आत उतरावे.उन्हाळ्यात किल्ल्यावर इतर ऋतुंच्या तुलनेने कमी गर्दी असते.